गोपीनाथ मुंडे यांच्यावरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची धुरा

मुंबई दि.१६- महाराष्ट्रात २०१४ साली होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची धुरा लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरच सोपविण्याचा निर्णय आरएसएस आणि भाजप बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.पक्षाच्या तसेच रा.स्व.संघाच्या वरीष्ठ नेत्यांनी नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कामाची न्याय वाटणी करून दोघांतील वाद मिटविण्याचे ठरविले असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार गडकरी दिल्लीतच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील तर मुंडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी घेतील.
  अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पक्षासाठी फार महत्त्वाच्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवर येऊन आता पंधरा वर्षे होत आहेत. त्यांच्याशी कडवी टक्कर पक्षाला द्यावी लागणार आहे. मुंबईच्या उपनगरात नुकत्याच पार पडलेल्या चिंतन बैठकीत या विषयावर वादळी चर्चा झाली असून संघाला अजूनही पॉलिसी मेकींगमध्ये तरूण रक्कतालाच प्राधान्य द्यावे असे वाटते आहे. जुन्या अनुभवी नेत्यांना विशेष भूमिका पार पाडावी लागणार आहे व  पक्षांतर्गत मतभेद मिटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत.
   भाजपची नॅशनल एक्झिक्युटिव्ह मिटींग येत्या २३ मेला होत असून या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी राज्य भाजपवर सोपविण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी या बैठकीला देशभरातून २५०० सदस्य उपस्थित राहतील असे सांगितले आहे.

Leave a Comment